सिंधुदुर्ग- नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे. यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण तर लक्षणीय आहे. हे पाहता समुद्रात होणाऱ्या मानवनिर्मित प्रदूषणाचा मुद्दा चर्चिला जाऊ लागला आहे. या प्रदूषणकारी कचऱ्यामुळे समुद्रापासून किनाऱ्याची होणारी धूप थांबवणारी खरपुटी वनस्पती, समुद्रीप्रवाळ, मत्स्यजीव यांचे जगणे अडचणीत आले आहे, असे मत सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.
'खारपुटी वनस्पती जीवन आले अडचणीत'
यावेळी बोलताना डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले ज्या गोष्टी आपण जमिनीवर करतो त्याचा अंत समुद्रात होतो. प्लास्टिक कचरा हा पाण्यावर तरंगत असतो. ज्यावेळी वादळ येते किंवा पावसाळ्यात समुद्राला उधाण येते तेव्हा वाऱ्याच्या वेगाने हा कचरा समुद्र किनारी येतो. प्लास्टिक कचऱ्याचे विभाजन केले जात नाही. त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. यामुळे हा कचरा समुद्रात जातो. समुद्र कुणाऱ्याची धूप थांबविण्यात महत्वाची असलेल्या खारफुटी वनस्पतीवर याचा परिणाम होतो. या वनस्पतीच्या मुळाला जाऊन हा कचरा अडकतो. त्याच्या नैसर्गिक जगण्यावर या कचऱ्याचा परिणाम होऊन या वनस्पती मरतात, असेही ते यावेळी म्हणाले.
'समुद्रातील डॉल्फिन, कासव मारण्याचे प्रमाण वाढले'
समुद्रातील डॉल्फिन, कासव अशा प्राण्यांना पाण्यावर तरंगणारी प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे त्याला जेलीफिश वाटतो. त्याला ते खायला जातात आणि हे प्लस्टिक त्याच्या अन्ननलिकेत जाते आणि त्याच्या पचनाच्या प्रक्रियेत परिणाम होऊन ते मरण पावतात. समुद्रातील डॉल्फिन, कासव यामुळे मारण्याचे प्रमाण वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले. महाकाय व्हेल माशाच्या पोटातही प्लास्टिक आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत, असेही डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सांगितले.