सिंधुदुर्ग- जिल्ह्यात गेले ३ दिवस सतत पाऊस कोसळत आहे. सलग एक आठवडा दडी मारलेल्या पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याविना खोळंबलेल्या भात लागणीच्या कामाला पुन्हा वेग आला आहे. जिल्ह्याती शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या भात लागवडीसाठी आवश्यक असलेली भाताची रोपे अर्थात तरवा लावणीसाठी तयार झाला आहे. योग्यवेळी त्याची लावणी झाली नाही तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पाऊस सुरु होताच बळीराजा पुन्हा एकदा शेतीकडे वळला आहे.
पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. साधारणपणे ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. मनुष्यबळाचा अभाव, आर्थिकदृष्ट्या न बसणारा ताळमेळ, भातविक्रीला मिळणारा नगण्य दर यामुळे भातशेतीचे क्षेत्र मागील काही वर्षांत कमी झाले आहे. परंतु मागील दोन तीन वर्षांत शासनाने यांत्रिकीकरणावर दिलेला भर, भाताच्या दरात झालेली सुधारणा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा भातशेतीकडे वळला असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्यावर्षी नैसर्गिक आपत्तीच्या चक्रात भातशेती अडकली होती. तरीदेखील अनेक शेतकऱ्यांनी या संकटावर मात करीत भातशेतीचे चांगले उत्पादन घेतले.