सिंधुदुर्ग - केरळप्रमाणे 'ग्रीन आर्मी' प्रकल्पाअंतर्गत भातशेती करण्यासाठी यांत्रिकीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे. ‘चांदा ते बांदा’ योजनेत वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रामार्फत कुडाळ तालुक्यात यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आंबेरी व सावंतवाडीतील हुमरस येथे भात लावणीची यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्गात यंत्राच्या मदतीने भात लावणी; 'ग्रीन आर्मी' प्रकल्पाचा अवलंब - सिंधुदुर्ग भातशेती
जिल्ह्यात केरळप्रमाणे 'ग्रीन आर्मी' प्रकल्पाअंतर्गत भातशेती करण्यासाठी यांत्रिकीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे. ‘चांदा ते बांदा’ योजनेत वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रामार्फत कुडाळ तालुक्यात यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

मनुष्यबळाच्या अभावामुळे दिवसेंदिवस भातशेतीकडे लोकांचा कल कमी होत आहे. यांत्रिकीकरणाद्वारे शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडते. तसेच शेतीही किफायतशीर होते. पारंपरिक पद्धतीने नांगरणी करून भातशेती करायची, तर वर्षभर जनावरांची काळजी घ्यावी लागते. ते आता परवडत नसल्याने याला तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी पावर टीलरने नांगरणी करून भातशेती करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर भात कापणीपासून मळणी करेपर्यंत यंत्राचाच वापर होत आहे.
मात्र भात लावणीसाठी सिंधुदुर्गात कोणीही यंत्राचा वापर करीत नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच भात लावणी-लागवडीची यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.
या यंत्राद्वारे भात लावणी किफायतशीर झाली आहे. एका दिवसात एक एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी करता येते. या मशिनच्या डिझेलसाठी फक्त 250 रुपये खर्च येतो. मनुष्यबळाचा वापर करून लावणीला पाच-दहा दिवस लागतात. तीच लावणी एका दिवसात होणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत अठरा शेतकऱ्यांनी ही यंत्रे घेतली असून अनेकांच्या शेतात यावर्षी प्रात्यक्षिके पार पडत आहेत. टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हय़ात सर्व शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाच्या वापराबाबत मार्गदर्शन करून ग्रीन आर्मी प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. भात लावणीपासून रोपवाटिका निवडणे, कोळपणी करणे, कापणी, मळणी करेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे.