सिंधुदुर्ग - ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
माहिती देताना प्रवीण दरेकर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या दरेकर यांनी अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे झाले काय? याबाबत विचारपूस केली. यावेळी आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, कणकवली तहसीलदार रमेश पवार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्याला गुंठ्याला केवळ १०० रुपये मिळतील -
यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले आम्हाला वाटले होत कि, सरकार भरीव मदत करेल. मात्र, सरकारने १० हजार रुपयांची जी मदत केली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण, पश्चिम महाराष्ट्रात ५ एकराच्या वर शेती बागायती आहे. तिथले शेतकरी बऱ्यापैकी सधन आहेत. आपल्याकडे कोकणात जास्तीत-जास्त ४० गुंठ्यांपर्यंत शेती आहे. १० हजार हेक्टरी पकडले तर येथील शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळतील. म्हणजे १० गुंठे शेती असेल त्याला १ हजार रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा असून काढणीचा खर्चच त्याला तेवढा येणार आहे.
असे पाचशे हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा
१० हजार कोटींमधील ५ हजार ५०० कोटी फक्त शेतीसाठी आहेत, बाकी ३०० कोटी नगरविकासला आहेत. उर्जा २३९ कोटी आहेत. रस्ते, पुलांसाठी २६०० कोटी रुपये आहेत. अशाप्रकारे हिशेब घातला तर गुंठ्याला फक्त ५ हजार ५०० कोटीतून ५५ रुपये येताहेत. त्यामुळे तुम्ही असे पाचशे हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा करता? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. तसेच निकष शिथील करून, स्वतंत्र तरतूद करून कोकणाला शेती नुकसानीसाठी वेगळे पॅकेज द्यावे, असेही ते म्हणाले.
या सरकारचा नियोजनाचा अभाव आहे. निसर्ग चक्रीवादळातील ६० टक्के मदत अजूनही लोकांपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने नियोजन करून मदत सरकारला जनतेपर्यंत पोचवावी लागेल, असेही दरेकर यांनी सांगितले.