सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील 1 हजार 250 हेक्टर उसापैकी आतापर्यंत 30 टक्केच उसाची तोडणी झाली आहे. कोरोनामुळे ऊसतोड मजूर कमी आल्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. धिम्यागतीने होणाऱ्या ऊसतोडणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षात ऊस तोडणीच्या समस्येमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यातच यावर्षी या समस्येत आणखी भर पडल्यामुळे नव्या लागवडीवर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र, कारखाना प्रशासनाकडून कामगार वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी केला होता 1 लाख टन ऊसाचा टप्पा पार
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथे अस्तित्वात आल्यानंतर या कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तीन तालुक्यात ऊसाचे क्षेत्राबरोबर उत्पादन देखील वाढले. 1 लाख टन ऊसाचा टप्पा येथील शेतकऱ्यांनी पार केला होता. पण, ऊसतोडणीच्या समस्येने हैराण झालेल्या काही शेतकऱ्यांनी ऊस शेतीतून माघार घेतली.
अतिशय धिम्या गतीने सुरू आहे तोडणी
सध्या या तीन तालुक्यात सुमारे 1 हजार 250 हेक्टर क्षेत्र ऊस शेतीखाली आहे. यावर्षी 70 हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऊस तोडणीला सुरुवात झाली. पण, कोरोनामुळे कारखान्याकडे ऊसतोडणी कामगार येण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. त्यामुळे या तिनही तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच टोळ्या सुरुवातीला पाठविण्यात आल्या. त्यामुळे अतिशय धिम्या गतीने तोडणी सुरू आहे. जानेवारी संपला तरी अजून 20 ते 22 हजार टन ऊस तोडणी झाली आहे.