सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज(बुधवार)आणखी एका रुग्णाचा कोरोना तपासणी आहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
मुंबईवरुन आलेल्या एका 17 वर्षीय युवतीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबईहून 5 कुटुंबीय जिल्ह्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबियांची कुडाळ येथे ग्रामिण रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ संस्थात्मक अलगीकरणाक ठेवण्यात आले होते. मुंबई येथील कंटेनमेंट झोनमधून आल्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये या युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, तिच्या कुटुंबियातील इतर व्यक्तींचा नमुना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सदर युवतीस कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एक अशी झाली आहे. तर, पोलीस, आरोग्य व महसूल विभागाने समन्वयाने राबवलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखता आल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या युवतीस वेळीच अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या अत्यंत कमी आहे. तसेच या कुटुंबियांना सिंधुदुर्ग येथे घेऊन आलेले वाहनचालक पुन्हा मुंबई येथे परतले आहेत. त्याविषयी मुंबई येथे प्रशासनास माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. नवीन पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू असून त्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही आरोग्य यंत्रणेकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील एक गरोदर महिला मुंबई येथून आली आहे. तिला सावंतवाडी येथे सोडण्यासाठी आलेले तिचे मामा आज कोल्हापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. सदर महिलेची तपासणी करण्यात आली असून तिचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तिने 25 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय येथे एका अपत्यास जन्म दिला असून माता व बालक दोन्ही तंदरुस्त आहेत.
सध्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 69 रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यातून तपासणीसाठी आजपर्यंत एकूण 349 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 316 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 33 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आरोग्य विभागातर्फे आज 2 हजार 720 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 228 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून 110 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यातील सद्यस्थिती खालीलप्रमाणे -
1. घरीच अलगीकरण करण्यात आलेले - 228
2. संस्थात्मक अलगीकरणात असलेले - 110