सिंधुदुर्ग - सर्वसामान्य गोरगरीब माणसाला योग्य पद्धतीने न्याय कसा मिळेल, या दृष्टीने आजच्या नवोदित व वरिष्ठ वकिलांनी नव्या तंत्रज्ञानाचे नवे कायदे अभ्यासायला हवेत. यासाठी अशा कार्यशाळा सातत्याने होणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळेतून नवोदित वकिलांना कायद्याबाबत अधिक माहिती होण्याला मदत होणार असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यानी व्यक्त केले.
'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र' आणि 'गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन'च्या संयुक्त विद्यमाने नवोदित वकिलांसाठी सिंधुदुर्ग नगरीतील शरद कृषी भवन येथे एक दिवसीय कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांच्या हस्ते या कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील कोतवाल, गोवा राज्याचे अॅड. जनरल देविदास पांगम, बार कौन्सिल सदस्य गजानन चव्हाण, अॅड. सुधाकर आव्हाड, अॅड. जयंत जयभावे, रत्नागिरी बार असोसीएशन अध्यक्ष अशोक कदम, अॅड. विवेकानंद घाडगे, 'बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा'चे सदस्य अॅड. संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे आदी उपस्थित होते.
आजच्या बदलत्या काळात वकिली क्षेत्रासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. अशा स्थितीत नवोदित वकिलांना कायद्याची व नव तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यांनी ती जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गोरगरीब सर्वसामान्य माणसाला योग्य पद्धतीने न्याय कसा मिळेल या दृष्टीने नवोदित वकिलांनी अभ्यास करायला हवा. अशा कार्यशाळेतून खूप काही शिकता येते, त्यामुळे याचा लाभ नवोदित वकिलांनी घ्यावा असे आवाहन केले.