सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील नर्सनी शनिवारी अघोषित काम बंद आंदोलन छेडल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनमध्ये उपस्थित राहत जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. यावेळी स्टाफ नर्सकडून एकापाठोपाठ एक समस्यांचा अक्षरक्ष: पाढाच वाचण्यात आला. दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी नवीन मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकांनी मांडले गाऱ्हाणे
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील नर्सनी शनिवारी अघोषित काम बंद आंदोलन छेडल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ आज सकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनमध्ये उपस्थित राहत जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सचे गाऱ्हाणे ऐकून घेतले.
पडद्यामागील धुमसत्या समस्यांना अखेर पालकमंत्र्यांच्या समोरच तोंड फुटले -
जिल्हा रुग्णालयात अपुरे असलेले वैद्यकीय साहित्य, तसेच लॅब टेक्निशियनकडून रुग्णांचे ब्लड सॅम्पल न घेता ते काम नर्सवर सोपवणे, सॅम्पल घेऊन लॅबमध्ये पाठवलेले सँपल “नॉट करेक्टेड” असा रिमार्क मारला जातो असेही या नर्सकडून सांगण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गावकर यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबाबत नर्सनी पालकमंत्र्याचे लक्ष वेधले. तसेच फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हा रुग्णालय येथील सफाई कर्मचारी व अन्य कर्मचार्यांचे पगार झाले नसल्याकडेही पालकमंत्र्यांची लक्ष वेधण्यात आले. रुग्णालयातील महिला स्वच्छतागृहाला दरवाजे नसल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आली. यासह अनेक प्रश्नांची सरबत्ती करत जिल्हा रुग्णालयातील गेले काही महिने सुरू असलेल्या पडद्यामागील धुमसत्या समस्यांना अखेर पालकमंत्र्यांच्या समोरच पुन्हा एकदा तोंड फुटले.
नर्सच्या नियुक्तीबाबत बैठक बोलवावी -
तुम्ही मांडलेले मुद्दे तात्काळ सोडवण्याच्या दृष्टीने आजच कार्यवाही सुरू करण्यात येईल. असे सांगत या समस्याही जिव्हाळ्याने घेतल्या जातील व त्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करू, असे आश्वासन देताना यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आरोग्य आणि वित्त मंत्र्यांशी चर्चा करून नर्सच्या नियुक्तीबाबत बैठक लावावी. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, नर्सना योग्य त्या सोयीसुविधा तात्काळ रुग्णालय प्रशासनाने पुरवाव्यात. त्यांच्या शासनस्तरावरील मागण्यांबाबत लवकरच बैठक लावण्यात येईल. त्यासाठी निश्चितच पाठपुरावा करून सोडवल्या जातील. कामाचा ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची भरती करण्यास सुरुवात करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोविडसाठी बेड वाढवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना -
पालकमंत्री सामंत यांनी कोरोना प्रतिबंधक आणि उपाययोजनांबाबतही आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांसाठी वाढीव बेडची सुविधा करावी. मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे करण्यासाठी संबंधित कंपन्यांशी करार करावेत. यानंतर त्यांनी आयुष्य रुग्णालयाचे सुरु असणाऱ्या बांधकामाची पाहणी करुन अभियंत्यांना सूचना केल्या. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.