सिंधुदुर्ग - निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या परराज्यातील बोटीवर कारवाई केली. मात्र, मतदानानंतर ही कारवाई आता शांत झाली आहे. त्यामुळे मत्स्य विभाग आणि पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा समुद्रात फटाके फुटल्यास आम्ही जबाबदार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
बेकायदेशीर मच्छिमारी रोखा, अन्यथा समुद्रात फटाके फुटतील - नितेश राणे
समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींच्या छायाचित्रणाने त्यांनी ही बाब समोर आणली आहे.
देवगड किनारपट्टीवर गेले दोन दिवस परराज्यातील नौकांकडून बेकायदेशीररित्या मच्छीमारी सुरू असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमारांनी केला आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींच्या छायाचित्रणाने त्यांनी ही बाब समोर आणली आहे. सिंधुदुर्गात प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर एलएडी मासेमारीवर धडक कारवाई करण्यात आली. मात्र सध्या प्रशासन कारवाई करत नसल्याचा पारंपरिक मच्छिमारांचा आरोप आहे.
दरम्यान, निवडणुका तोंडासमोर ठेवून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कारवाईचा फार्स केला होता. मात्र, निवडणुका झाल्यावर कारवाई झालेली नाही. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक सगळे गप्प आहेत. त्यामुळे काल आपण मत्स्य अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच ही बेकायदा मच्छीमारी रोखा, अशा सूचना दिल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे तत्काळ यंत्रणेने योग्य ती दखल घेऊन संबंधित परराज्यातील मच्छीमारांवर कारवाई करावी. अन्यथा आम्ही समुद्रात फटाके फोडू, असा इशारा देखील नितेश राणे यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे तळकोकणातील समुद्रात पुन्हा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.