सिंधुदुर्ग- मुंबईतील वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरमध्ये जाते. ईडीचा तपास अजून थोडा खोलात जाऊन झाला आणि भुयारी गटारातून ते गेले तर थेट कलानगरमध्ये पोचतील. मुख्य सूत्रधार हा कलनागरमध्ये बसला आहे, अशी टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते कणकवली येथे बोलत होते.
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले असल्याचे कळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहीम सुरू आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेस आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.