सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीचा संयुक्त पाहणी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झाला आहे. २९९ शेतकऱ्यांचे २४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बागायत आणि फळपिकाचे मिळून १२ लाख ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा अहवाल सादर करण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९९ शेतकऱ्यांचे नुकसान, अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर - सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अपडेट बातमी
२ व ३ जूनला जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पाहणीचा पंचनामा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
दिनांक २ व ३ जूनला जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यामध्ये अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ३३ टक्क्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पाहणीचा पंचनामा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या अहवालाच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर सोपविण्यात आली होती.
त्यानुसार करण्यात आलेल्या पाहणीत नारळ, केळी, सुपारी व अन्य बागायती पिकांचे मिळून ५.०७ हेक्टर क्षेत्रावरील ११४ शेतकऱ्यांचे २ लाख ५४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर आंबा व काजू या फळपिकाचे १९.७० हेक्टर क्षेत्रातील १८५ शेतकऱ्यांचे ९ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त पंचनामा अहवाल जून महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात सादर होणे अपेक्षित होता. मात्र, तो जुलै महिन्यात सादर करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एकूणच कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या विलंबाचा खुलासा करण्याचे आदेश त्यांनी जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांना याची कारणे देण्याचे आदेश दिले आहेत.