सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळाने कोकणात फार फार मोठे नुकसान झाले आहे. परंतु, सरकारने केलेली मदत ही मात्र त्यामानाने पुरेशी नाही. महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना जशी दसपट मदत दिली गेली, तशीच मदत चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने द्यावी, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त कोकणचा संपूर्ण दौरा केल्यानंतर आमदार लाड कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर अनेक मागण्या करत आतापर्यंत मदतीच्या धोरणावर टीका केली.
आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...धक्कादायक! पोटात गर्भ टिकत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या..
कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. सरकारने रायगड जिल्ह्याला 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 कोटी मदतनिधी जाहीर केला आहे. मात्र, हा निधी येथील बागांच्या साफसफाईलाही पुरणार नाहीत. कोकणातील शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे. यासाठी त्याला दसपट मदत केली पाहिजे, असे आमदार लाड यावेळी म्हणाले.
अद्याप कोकणातील वादळग्रस्त भागात लाईट नाही, बँका बंद आहेत, नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. मुख्यमंत्री कोरोनाच्या भीतीने रायगड जिल्ह्याच्या पुढे देखील आले नाहीत. सरकारमधील सर्व पक्षाचे मंत्री वेगवेगळा आढावा घेत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा.."चटणी-भाकर खात होतो.. ती पण देवाने हिरावून घेतली" आशा सेविकेची व्यथा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा कोकण दौरा आणि मुख्यमंत्र्यांची भेट...
कोकणला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडचा दौरा करुन मदत जाहीर केली. तर शरद पवार यांनी संपुर्ण नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यांना काही सुचना केल्या. यानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील दोन दिवसांचा कोकण दौरा करत नुकसानग्रस्त भागाला भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी काही मागण्याचे निवेदन देखील सादर केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या 'या' मागण्या..
शनिवार (दि. 13 जुन) रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, सुनील राणे आदी नेते उपस्थीत होते. या भेटीत त्यांनी, 'कोकणमध्ये हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा. यासह मासेमारांसह शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारी करणाऱ्यांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावेत. वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प आहेत, त्यामुळे तातडीची मदत रोखीने देण्यात यावी' अशा विविध 19 मागण्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनामार्फत सादर केल्या आहेत.
हेही वाचा...'कोकणी माणूस स्वाभिमानी असल्याची कल्पना असेलच, तेव्हा..' फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या 'या' 19 मागण्या
निसर्ग चक्रीवादळ.. त्या एका दिवसात कोकणची कधी नव्हे एवढी हानी झाली..
दिनांक 3 जुनला निसर्ग चक्रीवादळ कोकणात धडकले आले आणि त्या एका दिवसात कोकणची कधी नव्हे इतकी मोठी हानी झाली. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील घरांचे मोठे नुकसान झाले. घरांसह, महावितरण, आंबा, नारळ, सुपारीच्या बागांचे, शेतीचे अतिशय मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळानंतर महाराष्ट्र्तील किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे कोकणवासियांना आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे.