सिंधुदुर्ग - गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात काही कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठ्यातील हलगर्जीपणामुळे झाला. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय व ऑक्सिजन व्यवस्थापन व वितरणच्या प्रमुख स्वेतिका सचन या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हलगर्जीपणा, कटकारस्थान तसेच सदोष मनुष्यवध या आरोपाखाली आगशी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याने न्यायालयाने सर्व कारभार आपल्या हातात घ्यावा, असे म्हटले आहे.
'मृत्यूला सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा जबाबदार'
बांबोळी येथील गोमेकॉ रूग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा व सुविधा पुरवण्याची या तिघांची जबाबदारी होती. या रुग्णांना कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा झाल्याने अनेकांचा जीव गेला. मुख्यमंत्र्यांनी काल पीपीई किट घालून कोरोनाग्रस्त व्हेंटिलेटरवरील रुग्णांची पाहणी केली. ऑक्सिजन पुरवठा रुग्णांपर्यंत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असावा. रात्रीच्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा एकाएकी थांबल्याने अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच काहींचा मृत्यू झाला. साधन सुविधायुक्त असलेल्या राज्यातील गोमेकॉ रूग्णालयात २६ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्याला सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा जबाबदार आहे' असे तक्रारीत म्हटले आहे. तर '75 रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे', असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसह तिघांविरोधात तक्रार