सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातून खूनाची घटना उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहारातून हा खूनाचा संशय व्यक्त करण्यात आल आहे. शवविच्छेदन अहवालानंतर खिल्लारे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सुशांत आप्पासो खिल्लारे (२६, रा. पंढरपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
नातेवाईक दोन दिवसांनी सावंतवाडीत दाखल : आर्थिक व्यवहारातून खून करण्यात आलेल्या सुशांत खिल्लारे याचे नातेवाईक गुरुवारी दोन दिवसांनी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात सकाळी सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अपहरण करणे, डांबून ठेवणे, पुरावा नष्ट करणे यासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहारातून खून : याबाबत फुलचंद मेंगडे म्हणाले की, या प्रकरणात संबंधित खिल्लारे याचे नातेवाईक आले. परंतु त्यांनी आपला आणखी कोणावर संशय नाही, तसेच अन्य कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार आता पुढील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध माहिती व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
आईला केला होता फोन :खिल्लारे याने २९ जानेवारीला रात्री आपल्या आईशी शेवटचा संपर्क साधला होता. त्यात त्याने पैसे दिले नाही तर आपला हे जीव घेतील, असे सांगितले होते. खिल्लारे याचे नातेवाईक सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी ही माहिती दिली आहे. सुशांत खिल्लारे हत्या प्रकरणाचा तपास सावंतवाडी पोलिसच करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तपास कऱ्हाड पोलिसांकडे वर्ग केला जाईल, असे सांगण्यात येत होते. पण आता हा तपास सावंतवाडीतूनच होणार, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आंबोली येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.
हेही वाचा :Devendra Fadnavis on Kasba Chinchwad Election : कसबा, चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करणार - फडणवीस