सिंधुदुर्ग - सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागात भरवस्तीत दफन करण्यात आलेला तो मृतदेह अखेर पालिका प्रशासनाने बाहेर काढला आहे. हा मृतदेह संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर काढून योग्य त्या ठिकाणी दफन करावा अन्यथा पालिका प्रशासन पोलीस बंदोबस्तात कारवाई करेल, असा आदेश सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली. यावेळी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भरवस्तीत दफन करण्यात आलेला 'तो' मृतदेह सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने काढला बाहेर
संबंधित गिरी कुटुंबाने सावंतवाडीतील भारती मठाच्या आवारात महंत यांचा मृतदेह दफन केला होता आणि आपली दफनभूमी असल्याचे सांगितले होते. त्याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे दोन्ही पक्षकारांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली. त्यात गिरी यांच्या बाजूने ॲड. सुभाष पणदूरकर तर नगरपालिकेच्या वतीने ॲड. पि.डी. देसाई यांनी काम पाहिले.
संबंधित गिरी कुटुंबाने सावंतवाडीतील भारती मठाच्या आवारात मठाधिपती श्रीकृष्ण गिरी यांचा मृतदेह दफन केला होता. ही आपली दफनभूमी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे दोन्ही पक्षकारांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली. त्यात गिरी यांच्या बाजूने ॲड. सुभाष पणदूरकर तर नगरपालिकेच्या वतीने ॲड. पि.डी. देसाई यांनी काम पाहिले. यापूर्वीही शहरात अशी घटना घडली होती, त्या वेळेस मृतदेह बाहेर काढून दुसरीकडे नेला होता असा दाखला देण्यात आला होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सदरचा मृतदेह सहा वाजेपर्यंत संबंधित कुटुंबीयांनी बाहेर काढून अन्यत्र दफन करावा. तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई करून पोलीस बंदोबस्तात नगरपालिका प्रशासनाने तो मृतदेह बाहेर काढून दफन करावा, असे आदेश दिले होते.
सायंकाळी सहा वाजता तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गिरी समाजाने यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन सादर केले. समाधी देण्यात आलेल्या महंत यांच्या मृतदेहाची विटंबना होऊ नये, असे आवाहन त्यांनी या निवेदनाद्वारे केले. मात्र अखेर प्रांताधिकारांच्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात आली.