पणजी-राज्यात सध्या मागच्या दोन दिवसापासून काँग्रेसचे आमदार बंडाच्या ( Congress MLAs in Goa ) तयारीत आहेत. राज्यात सध्या काँग्रेसचे 11 आमदार ( rebel in Goa Congress ) आहेत. त्यातील सहा आमदार भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. मात्र, अद्याप पाच आमदार काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांना रात्रीच अज्ञातस्थळी हलविले आहे. आता हे काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते मुकुल वासनिक आज दुपारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत.
मायकल लोबोंना विरोधी पक्षनेते पदावरून हटविले-काँग्रेस आमदारांचा दोन तृतीयांश गट भाजपमध्ये विलीन करण्यासाठी विरोधी पक्षनेते मायकल लोबो व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पुढाकार घेतला होता. मात्र तूर्तास सहा आमदारांना आपल्या सोबत नेण्यास लोबो ( Michael Lobo rebel ) व कामत यशस्वी झाले आहेत. अन्य दोन आमदार आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न दोघेही नेते करत आहेत. हाच ठपका ठेवून काँग्रेस इन्चार्ज दिनेश गुंडूराव यांनी रविवारी मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवले आहे. तर दिगंबर कामत ( former chief minister Digambar Kamat ) यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसचे बंड रोखण्याचे आव्हान आता दिल्लीत-काँग्रेसचे 10 जुलैला 2019 साली या रात्री दहा आमदारांचा गट फुटून भाजपात दाखल झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती गोव्यात होणारा असल्याच्या चर्चा व तशी परिस्थिती सध्याच्या घडीला राज्यात आहे. काँग्रेसच्या 11 पैकी सहा आमदारांना भाजप प्रवेशाच्या हालचाली मागील दोन दिवसापासून सुरुवात झाली आहे. मात्र काँग्रेसचे फक्त सहा आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. अन्य पाच आमदारांना रोखण्यासाठी काँग्रेसने मागच्या दोन दिवसापासून प्रयत्न केले आहेत. या आमदारांना कायदेशीर व पक्षाच्या आदेशाला अनुसरून बाबींचे भय घालून रोखण्याचा प्रयत्न कालपर्यंत काँग्रेसने केला होता. मात्र यातील काही आमदार अजूनही फुटीच्या वाटेवरती आहेत. या आमदारांना रोखण्याचे आव्हान काँग्रेस समोर आहे. म्हणूनच दिल्लीतील काँग्रेस नेते मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील बाबींवर चर्चा ते आमदारांसोबत करणार आहेत.