सिंधुदुर्ग -टोलमधून मलिदा मिळवण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना मुंबई-गोवा महामार्गाचे लोकार्पण करण्याची घाई झाली आहे की काय, अशी शंका मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली. मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही शंका व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाचा लोकार्पण सोहोळा केला जाईल, अशी घोषणा केली होती. ही घोषणा हास्यास्पद आहे. येथील लोकांच्या अनेक समस्या आहेत. अद्यापही लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. किंबहुना महामार्गासंबंधी प्रश्न सुटण्यासाठी खासदार राऊत यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, आपण लोकांसाठी काहीतरी करतो आहे, हे दाखवण्यासाठी केवळ त्यांनी फोटोबाजी केली, असे उपरकर म्हणाले.