सिंधुदुर्ग- जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी आतापर्यंत तब्बल 6 हजार 746 जणांनी विनंती अर्ज दाखल केले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येण्यासाठी 9 हजार 27 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील 95 टक्के नागरिक हे मुंबई, ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणचे आहेत. तर 454 नागरिक इतर राज्यात अडकलेले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणच्या नागरिकांनी अर्ज केले असले, तरी शासनाने कामगार, यात्रेकरू व विद्यार्थ्यांसाठीच येण्याजाण्याची परवानगी दिलेली आहे. सर्व नागरिकांसाठी परवानगी दिलेली नाही. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 164 जणांना जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे. तर आज गोवा राज्यातून 106 मुले सिंधुदुर्गात दाखल होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिली.
मुंबईतील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली नसली, तरी चाकरमानी सिंधुदुर्गात आल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी ग्राम समित्यांमार्फत पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकलेल्या कामगार, यात्रेकरू व विद्यार्थी अशा 6 हजार 746 जणांनी आतापर्यंत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. त्यातील 5 हजार 273 नागरिक हे राज्यातील आहेत. तर उर्वरित नागरिक हे इतर 16 राज्यातील आहेत, अशी माहिती मंगेश जोशी यांनी दिली.
जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 9 हजार 27 नागरिकांनी जिल्ह्यात येण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील फक्त 454 नागरिक हे इतर राज्यातून येणार आहेत. तर उर्वरित सर्व नागरिक मुंबई, ठाणे, पुणे व पालघर या ठिकाणाहून येण्यास इच्छुक आहेत. जिल्ह्याबाहेरून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असले, तरी इतर राज्यात व महाराष्ट्र राज्यात जे कामगार, यात्रेकरू व विद्यार्थी अडकलेले आहेत, अशा नागरिकांनाच प्राधान्याने जिल्ह्यात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. मुंबईतील नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी अद्याप शासनाने कोणतीही परवानगी दिलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांची छाननी करून त्यांची योग्य ती आरोग्य तपासणी करून जिल्ह्याबाहेर पाठवण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसांत 164 जणांना जिल्ह्याबाहेर पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 129 नागरिक हे राज्यस्थानमधील, 24 उत्तरप्रदेशमधील तर 11 नागरिक हे हैदराबादमधील आहेत. तसेच जिल्ह्यातील 254 नागरिक गोवा राज्यामध्ये अडकलेले असून पहिल्या टप्प्यात 106 मुलांना बुधवारी आणण्यात येत आहे. याबाबत गोवा राज्य शासनाची परवानगी घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच आरोग्य तपासण्याही करण्यात आल्या आहेत. उर्वरित नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात आणले जाणार आहे.
भविष्यात चाकरमानी वेगवेगळ्या कारणांनी येऊ लागल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक गावात ग्राम समित्यांमार्फत शाळांची स्वच्छता करणे तसेच गावामध्ये धर्मशाळा, भक्तनिवास, हॉटेल्स किंवा अन्य राहण्याची व्यवस्था असेल, तर ती पूर्व तयारी म्हणून अधिग्रहित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
हेही वाचा -लॉकडाऊन इफेक्ट : कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांची शासकीय कार जप्त