सिंधुदुर्ग - चिपी विमानतळ आम्हीच केले, अशा बढाया शिवसेना आणि भाजपाची नेतेमंडळी मारत आहेत. मात्र या सत्ताधाऱ्यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही. राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत. या खड्डयांचेही श्रेय सत्ताधाऱ्यांनी घ्यावे, अशी टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केली आहे. तसेच विमानतळ हा राज्याचा प्रकल्प आहे, त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लुडबूड करू नये, असेही ते म्हणाले.
'खड्ड्यांचीही जबाबदारी घ्यावी'
मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचे तीन वेळा भूमिपूजन केले. पण हा प्रकल्प वेळेत झाला नाही, या विलंबाचे श्रेय राणेंनी यांनी घ्यायला हवे. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याही मंत्रिपदाच्या काळात विमानतळ होऊ शकले नाही. अखेर बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा विमानतळ पूर्ण झाले आहे. पण विमानतळापर्यंत जाण्यासाठीचे रस्ते खड्डेमय आहेत.