सिंधुदुर्ग -महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, या एका वर्षात या सरकारने जनतेची निराशा केली आहे. हे सरकार न्याय देणारे नाही तर जनतेवर अन्याय करणारे आहे. सरकारचे एक वर्ष काळ्या दिवसांसाखे आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथे मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची प्रतिक्रिया. सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला -
राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरकारच्या स्थापनेवेळची नाटके जनतेने पहिली आहेत. कशाप्रकारे विरोधाभास असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, हे जनतेने पाहिलेले आहे. या सत्तेतून जनतेची काम व्हावीत किंवा त्यांचा कुठेतरी सुखकर प्रवास व्हावा, यासाठी जनता अपेक्षेमध्ये होती. मात्र, या कोरोनाच्या काळात सरकारने जनतेचा अपेक्षाभंग करून ठेवली आहे, असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा -महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राची प्रगती करत कार्यकाळ पूर्ण करणार - अस्लम शेख
आरोग्य यंत्रणेचीही स्थिती वाईटच...
हे सरकार चांगली आरोग्य सुविधाही देऊ शकलेले नाही. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचीही अत्यंत वाईट स्थिती आहे. जिल्ह्यातील आरोग्याच्या जागा रिक्त आहेत. ज्यांची कंत्राटी भरती कोरोनाच्या काळात केली, त्यांचे पगार अजूनही झालेले नाहीत. जिल्ह्याची स्थिती अत्यंत वाईट आहे.
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना जिल्ह्यात पालकमंत्री, आमदार, खासदार मोठमोठ्या घोषणा करत आहेत. एकाबाजूला तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी रुपयांच्या कामाच्या घोषणा करायच्या, हे धोरण दिशाभूल करणारे आहे. हे पैसे कुठून आणणार? हे मात्र हे लोक सांगत नाहीत. जिल्ह्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मच्छिमारांचे प्रश्न प्रलंबित आहेत, याकडे सत्ताधारी लक्ष देत नसल्याचे ते म्हणाले.