महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाचणी’ तयार आहे, फक्त योग्य वेळ येऊ द्या! आमदार नितेश राणेंचा सूचक इशारा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील उद्धव यांच्या भाषणावर टीका करत योग्य वेळ द्या म्हणत सूचक इशारा दिला आहे. दरम्यान ठाकरे यांनी राणे यांच्या कुटुंबावर बेडूक असे सबोधत अप्रत्यक्ष टीका केली होती.

MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणेंचा सूचक इशारा

By

Published : Oct 26, 2020, 11:53 AM IST

सिंधुदुर्ग- शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांवर टीका करण्याव्यतिरिक्त अन्य काहीही केले नाही. मुख्यमंत्री म्हणून तरी काही सकारात्मक बोलतील अशी अपेक्षा दसरा मेळाव्यापासून दूर ठेवलेल्या शिवसैनिकांना होती. पण निरर्थक टीका आणि चोथा झालेले थुकरट विनोद यापेक्षा या मेळाव्यातून मुख्यमंत्री म्हणून या शिवसेना पक्षप्रमुखांनी काहीही दिले नाही, अशी खंत अनेक शिवसैनिकांनी बोलताना व्यक्त केली असल्याचे म्हणत टाचणी’ तयार आहे, फक्त योग्य वेळ येऊ द्या, अशा शब्दात ट्विट करत कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून आमदार नितेश राणे यांनी “जास्तच हवा भरलेली....” असं म्हणत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणे पिता पुत्रांवर टीका केली होती.

बिळातून जहरीले फुत्कार-

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यासह देशातील राजकारणावर अर्थहीन भाष्य केले. विचारांचे सोने जाहीरपणे लुटण्याची परंपरा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच लयाला गेली असून फक्त बिळातल्या बिळात जहरीले फुत्कार सोडण्याची नवी परंपरा उदयाला आली असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. तर, अनेक शिवसैनिकांनी मेळाव्याला न येण्याची शिवसेनेने केलेली सूचना योग्यच असल्याचे मत खासगीत बोलताना व्यक्त केले असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका करत इशारा दिला आहे. “बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “वॅक्सिन” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली .... किती आव... ‘टाचणी’ तयार आहे. फक्त योग्य वेळ येऊ द्या,” असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सुचक गर्भित इशारा दिला आहे.

ताठ मानेने परतणे अवघड झाले असते-

बाळासाहेबांच्या आजवरच्या जाहीर मेळाव्याला काट देत बंदिस्त सभागृहात काही ठराविक समर्थकांच्या कंपूत भरवलेल्या आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता. पण, निष्फळ टीकाटिपण्या आणि पोकळ आव याव्यतिरिक्त या मेळाव्यात काहीही नव्हते. तळघरात हा मेळावा घेतला हेच योग्य झाले, अन्यथा आजच्या भाषणानंतर रस्त्यावरुन ताठ मानेने परतणे अवघड झाले असते, असे परखड मत अनेक कट्टर शिवसैनिकांनी व्यक्त केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांचे सोने उधळण्याची सवय जडलेल्या शिवसैनिकांनी आज हाताच्या बंद मुठी आवळून डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांची उणीव अनुभवली, असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details