सिंधुदुर्ग - देशभरात हाथरस बलात्कार घटनेने हाहाकार माजविला असतानाच आज सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा बलात्काराच्या घटनेने हादरला. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग विभागातील गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मुलीला एकट्यात गाठून जंगलात नेऊन पीडितेवर अत्याचार केला. फेब्रुवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू असून मुलगी आठ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेने आज (शनिवारी) दुपारी कणकवली पोलीस ठाण्यात याबाबतची आपली फिर्याद दाखल केली.आरोपी भाऊ विवाहित असून तो तीन मुलांचा बापही आहे.
चुलत भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर बलात्कार; सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग विभागात खळबळ - सिंधुदुर्ग बातमी
विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील ही अल्पवयीन मुलगी आपल्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन कामाच्या ठिकाणी जात असताना वाटेत अडवून तिच्याच चुलत भावाने हा अत्याचार केला.
विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील ही अल्पवयीन मुलगी आपल्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन कामाच्या ठिकाणी जात असताना वाटेत अडवून तिच्याच चुलत भावाने हा अत्याचार केला. पहिल्यांदा जबरदस्ती केली तेव्हा मुलगी घाबरलेली होती तिने कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर तिला धमकी देऊन आणि आडवळणी तिची वाट अडवून तिच्यावर जंगलभागात पुन्हा काही दिवस अत्याचाराचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. ही घटना जेव्हा घरात कळली तेव्हा दबावाखाली कुटुंबाला काहीच तक्रार करता आली नाही. आज कणकवलीतील एका खासगी डॉक्टरकडे मुलीला आणले असता ही घटना उघड झाली. त्यानंतर सहाय्य्क जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजीराव मुळीक, कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला पोलीस अधिकारी गायत्री पाटील यांनी पीडित मुलीची कैफियत जाणून घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल -
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा मुलीचा चुलतभाऊ असून त्याचे वय ३३ वर्ष आहे. तो विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. अशा पुरुषाने केलेल्या या अत्याचाराचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. दरम्यान, कणकवली पोलिसांनी आरोपीवर अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार, मारण्याची धमकी, असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलीचे संरक्षण करणाऱ्या पोस्को कायद्यांतर्गत आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.