सिंधुदुर्ग - आम्ही दोन दिवसाचे तरी अधिवेशन घेतले, आपण केंद्रात काय केलात? आम्हाला पळपुटे म्हणता, मग अधिवेशन न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय म्हणावे? असा प्रश्न विचारत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारने यंदा केवळ दोनच दिवसांचे अधिवेशनाचे आयोजन केल्याने विरोधी पक्ष भाजपाकडून टीका करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंत्री सामंत यांनी भाजपाचा समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्ही दोन दिवसांचे तरी अधिवेशन घेतले, केंद्राने काय केले? मंत्री सामंताचा भाजपावर निशाणा - संसदेचे हिवाळी अधिवेशन २०२०
राज्यातील हिवाळी अधिवेशनावरून विरोधी पक्ष भाजपाने राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. मात्र, त्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने संसदेचे हिवाळी आंदोलनच रद्द केले. त्यावर आता राज्यातील भाजप नेते मोदींना काय म्हणणार असे म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे.
शेतकरी आंदोलनामुळे यांना रस्त्यावरून सुद्धा जाता येत नाही-
यावेळी मंत्री सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही 2 दिवसाचे तरी अधिवेशन घेतले, मात्र केंद्र सरकारने काय केले? शेतकरी आंदोलनामुळे यांना रस्त्यावरून सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे यांना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने जावे लागते आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर ही परिस्थिती आणली आहे. आम्ही 2 दिवस अधिवेशन घेतले म्हणून राज्यात भाजपच्या नेत्यांनी आम्हाला पळपुटे संबोधले, मग मोदींनी अधिवेशन रद्द का केले याचे उत्तर अगोदर द्या? असेही ते म्हणाले. तर तुम्ही आम्हाला पळपुटे म्हणता, मग आम्ही मोदींना असे म्हटलं तर चालेल का? शेवटी त्यांचा हुद्दा कुठे आणि यांचा कुठे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.