सिंधुदुर्ग - जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ओरोस मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय) हॉलची पाहणी आज(शुक्रवारी) पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उप अभियंता जोशी आदि उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव ताडडीने पाठवा-
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, शासकीय महाविद्यलयासाठी लागणारी जागा महसूल विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताकडे वर्ग करावी. त्याबरोबर अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही तातडीने करावी. प्रस्तावासाठी डॉ.मोरे यांना लागणाऱ्या सर्व बाबीची संबंधित यंत्रणांनी पूर्तता करावी. अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या सूचनानुसार आय.टी.आय. मधील लागणारे हॉल वर्ग करुन देण्यात यावेत. तसेच वैद्यकीय महाविद्यायासाठी लागणाऱ्या विविध विभागांसाठी जिल्हा मुख्यालयातील इमारतीची जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभागांनी पाहणी करुन तसा अहवाल तातडीने सादर करावा.
खासदार विनायक राऊत यांनी यावेळी शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शायकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी शासनस्तरावर सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱी जागा हस्तांतरण करण्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती यावेळी सादर केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे याबाबतची माहिती सादर केली.