महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उमेदमार्फत बँक काढण्यासाठी शंभर कोटीचे भांडवल देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

उमेद संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. याबाबतची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे. तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तसेच कमी केलेल्या 123 कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतले आहे. त्याबाबतचाही शासन निर्णय काढण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री उदय सामंत
मंत्री उदय सामंत

By

Published : Oct 12, 2020, 10:12 PM IST

Updated : Oct 12, 2020, 10:41 PM IST

सिंधुदुर्ग- उमेद संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. याबाबतची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे. तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तसेच कमी केलेल्या 123 कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेतले आहे. त्याबाबतचाही शासन निर्णय काढण्यात आला आहे. उमेदच्या महिलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. महाराष्ट्रातील बचत गटांना ताकद देण्यासाठी उमेदमार्फत बँक काढण्यासाठी शंभर कोटी रुपयांचे भांडवल देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

बोलताना मंत्री सामंत

उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मंत्री उदय सामंत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मोर्चा स्थळी भेट देत महिलांशी संवाद साधला. मागणीपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला आहे. तसेच राज्य सरकारमार्फत अजून काही लाभ मिळवून देण्यासाठी नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत संघटनेची बैठक लावण्याची ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

आपल्या मागण्या मान्य झाल्याने महिलांनी घोषणा देत आंनद व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे राज्यभरातील चार हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आता या अभियानातील ग्रामसंघाच्या महिलांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. गाव पातळीवर या महिलांनी मोर्चा काढल्यानंतर आता राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (दि. 12 ऑक्टोबर) मुकमोर्चा काढत काढण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या. ओरोस येथील डॉन बोस्को शाळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 500 मीटरच्या परिसरात महिलांची मोठी रांग लागली होती. यामुळे ओरोस जिल्हा मुख्यालयातील मार्गावर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आपल्या अधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका यावेळी या महिलांनी मांडली. तसेच या अभियानातील कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्त्या देताना थर्ड पार्टी नेमणूक देऊ नये, अशी मागणी केली.

यावर राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या अधिकाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका सरकारच्या वतीने स्पष्ट केली. तसेच या पुढच्या काळात उमेद बँकेच्या माध्यमातूनही महिलांचा विकास केला जाणार असल्याचेही उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या मोर्चाची सरकारला दखल घ्यावी लागली असून आज सिंधुदुर्गातील महिला भगिणींमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा -सिंधुदुर्गात उमेद अभियानातील हजारो महिला उतरल्या रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मूक मोर्चा

Last Updated : Oct 12, 2020, 10:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details