महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार वादाच्या भोवऱ्यात, किराणा व्यापाऱ्यांबाबतच्या विधानाने व्यापारी महासंघ संतप्त - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

महसूल राज्यमंत्र्यांचा थेट "वसूलमंत्री" म्हणून उल्लेख करत किराणा व्यापारी वसूलमंत्र्यांचे हुजरे नाहीत, तुमचे विधान मागे घ्या अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.

Minister of State for Revenue Abdul Sattar
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये

By

Published : Nov 4, 2020, 3:55 PM IST

Updated : Nov 4, 2020, 4:50 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या आपल्या दौऱ्यात अनुपस्थित राहणाऱ्या मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना "मी तुम्हाला किराणा व्यापारी वाटलो का ?" असा सवाल करणाऱ्या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने त्यांच्याबाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. महसूल राज्यमंत्र्यांचा थेट "वसूलमंत्री" म्हणून उल्लेख करत किराणा व्यापारी वसूलमंत्र्यांचे हुजरे नाहीत, तुमचे विधान मागे घ्या अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये यांनी दिला आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये

महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात रेडी येथे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना मला काय किराणा व्यापारी समजता काय? अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. या विधानावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने आक्षेप घेतला आहे. याबाबत महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेट्ये म्हणाले की, गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्राच्या महसूल राज्यमंत्र्यानी विनाकारण किराणा व्यापाऱ्यांबाबत कुत्सित आणि हिणकस उद्गार काढल्याचे निदर्शनास येत आहे. कदाचित आपल्या आगत स्वागतात त्यांच्याच अखत्यारितील खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कुचराईने अंगाचा तिळपापड झालेल्या महसूल राज्यमंत्र्यांनी किराणा व्यापाऱ्यांच्या संदर्भात केलेली हे अनुचित विधान तात्काळ मागे घेऊन राज्यभरातील किराणा व्यापाऱ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा संबंधित मंत्र्यांच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन उभे करण्याची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांचे एकमुखी प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघात आहे; व्यापारी महासंघ वसूल मंत्र्यांच्या या बेजबाबदार विधानाचा तीव्र निषेध करीत आहे.

लाॅकडाऊनच्या काळातील मागील सहा-सात महिन्यात राज्यभरातील किराणा व्यापाऱ्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या हाकेला प्रतिसाद देत जीवाची जोखीम पत्करून गावागावातील तुटपुंज्या आणि विस्कळीत प्रशासन यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम अविश्रांतपणे केले आहे. मात्र असे असताना कोकणातील सामाजिक राजकीय वातावरणाची अजिबात जाण नसलेल्या वसूल मंत्र्यांनी ‘किराणा व्यापारी म्हणजे त्यांच्या समोर गोंडा घोळणारे त्यांचे हुजरे नव्हेत’ हे लक्षात घेऊनच टाळ्याला जीभ लावावी, असा इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

Last Updated : Nov 4, 2020, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details