सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळात कोकणातील नुकसानीच्या भरपाईपोटी निसर्ग चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसानभरपाई दिली जाईल, असे राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बाळासाहेब पाटील यांनी वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला या भागातील नुकसानीची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.
पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही -
यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आहे. पक्षीय मतभेद विसरून सर्वजण काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करत पाहणी केली आहे. पंचनामे झाल्याशिवाय किती नुकसान झाले हे समजणार नाही. नारळाचे, आंब्याचे, घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे चांगल्या पद्धतीने केले जातील. त्यानुसार शासन मदत जाहीर करेल. कोकणवासीयांनी विश्वास ठेवावा की महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितच दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.