सिंधुदुर्ग -जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी घुसले पाणी -
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील पावाचीवाडी रस्त्यालगत असलेल्या नदीचे पाणी रस्त्यावर येऊन नांदगाव-पावाचीवाडीचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. तसेच नदीचे पाणी शेतात जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे. नांदगाव मोरयेवाडी येथील हायवे लगत असलेल्या घरात बेळणे नदीचे अतिवृष्टीमुळे पाणी घुसण्याची सलग दुसऱ्या वर्षीही नामुष्की ओढवली आहे. तर कणकवलीतही काही निवासी संकुलात पाणी घुसण्याची घटना घडली.
माणगाव खोऱ्यात निर्मला नदीला पूर -
माणगाव खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे निर्मला नदी दूथडी भरून वाहत आहे. ठिकठिकाणी पुराचे पाणी शेतीत घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २७ गावांचा यामुळे संपर्कही तुटला आहे. दरम्यान, पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडुन नदी लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या प्रवाहामुळे वाहून आलेली झाडे पुलाला अडकलेली आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तर सध्यस्थीतीत नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कामानिमित्त आलेले लोक माणगावातच अडकले आहेत.