सिंधुदुर्ग : कोकणात व्यवसाय सुरू करण्यासाठी कधीच कोणी धाडस करत नाही. मात्र मुंबईत शिक्षणासह लहानाचा मोठा झालेला आणि एमबीए फायनान्स असलेल्या युवकाने आपल्या कोकणातल्या मूळ गावी येऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. सध्या त्याचा कोंबडी लेहर पोल्ट्री फार्म यशस्वीपणे सुरू आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये धोका कमी : सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातील चिंचवली गावचा मंदार पेडणेकर हा युवक मुंबईत एमबीए फायनान्सचे शिक्षण घेत होता. दरम्यानच्या काळात कोविड सुरू झाला आणि जॉब सेक्युरिटी नाहीशी झाली. त्याची कोविड कालावधीत विविध व्यवसायची चाचपणी सुरू होती. त्यातून कोंबडी लेहर पोल्ट्री फार्म त्याने सुरू करण्याचे ठरवले. कोंबडी लेहर पोल्ट्री फार्ममध्ये रिस्क कमी आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरू केला असे मंदार पेडणेकर सांगतो.
एक लाख वीस हजार नफा: मंदार पेडणेकर या युवकाने आपल्या चिंचवली या मूळ गावी दीड एकर क्षेत्रामध्ये कोंबडी लेहर पोल्ट्री फार्म उभा केला आहे. आठ गुंठा क्षेत्रात पोल्ट्री शेड बांधण्यात आले आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये दहा हजार कोंबड्या आहेत. या कोंबड्यांपासून नऊ हजार दोनशे अंडी दिवसाला मिळतात. तर अंड्यापासून महिन्याला निव्वळ नफा एक लाख वीस हजार रुपये मिळतो. सध्या पेडणेकर यांच्याकडे सहा कामगार काम करतात. सहा कामगारांना महिन्याला तीस हजार रुपये पगार दिला जातो. तर दोन लाखापर्यंत उत्पन्न जाते असे मंदार पेडणेकरने सांगितले.
वडिलांच्या पुण्याईमुळे शक्य झाले : पोल्ट्री प्रोजेक्ट उभा करण्यासाठी मंदार पेडणेकर यांना 60 ते 65 लाख रुपये खर्च आला आहे. पेडणेकर यांचे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत होते. मार्चमध्ये पेडणेकर यांचे वडील सेवानिवृत्त झाले. त्यांना मिळालेल्या रक्कमेतून हा प्रोजेक्ट उभा केला. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबईला नोकरी कर असे सांगितले होते. किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू कर असे सांगितले होते. वडिलांच्या पुण्याईमुळे मी हा व्यवसाय सुरू करू शकलो असे मंदार पेडणेकर आवर्जून सांगतो.