सिंधुदुर्ग : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे, आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांचा संयुक्त विद्यमाने सन २०१८ मध्ये कॉलीटी इम्प्रुमेन्ट ईन मॅथेमॅटिक्स एज्युकेशन प्रकल्पाकरता महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून ३२३ माध्यमिक गणित शिक्षकांची निवड चाचणी द्वारे करण्यात आली.
आयआयटी पवईची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ शिक्षकांना 'मास्टर ट्रेनर' पदवी - सिंधुदुर्गातील १२ शिक्षकांना मास्टर ट्रेनर पदवी
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे, व आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांचा संयुक्त विद्यमाने सन २०१८ मध्ये कॉलीटी इम्प्रुमेन्ट इन मॅथेमॅटिक्स एज्युकेशन (QIME) प्रकल्पाकरता महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून ३२३ माध्यमिक गणित शिक्षकांची निवड चाचणी द्वारे करण्यात आली.
निवड झालेलया शिक्षकांना आयआयटी मुंबई या अग्रगण्य संस्थेच्या गणित विभागातील तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गणित विषयात साहित्य निर्मिती, अध्यापन पद्धती, जिओजेब्राचा वापर, शैक्षणिक ई-साहित्य निर्मिती, व्हिडिओ निर्मिती इत्यादींचा समावेश होता. सदर प्रशिक्षण हे सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे ३ टप्यात पार पडले होते. प्रशिक्षणाच्या शेवटी जुलै २०२० मध्ये ८० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली व २० गुण हे व्हिडिओसाठी होते. सदर व्हिडिओ हे च्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेत. या परीक्षेमध्ये ३२३ पैकी २४६ प्रशिक्षणार्थी पात्र ठरले. त्या सर्वांना राज्यस्तरीय तज्ज्ञ मास्टर ट्रेनर ही पदवी देण्यात आली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १२ गणित अध्यापकांचा समावेश होता.
यशस्वी शिक्षकांमध्ये विधी वैभव मुद्राळे (कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे), संजय जोशी (टोपीवाला हायस्कूल, मालवण), संदीप तुळसकर (यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे), स्वप्नील पाटील (माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे), आनंद बामणीकर (दोडामार्ग इंग्लिश स्कुल), अंकुश तावडे (अनंतराव विठ्ठल फडणीस विद्यामंदिर, घोणसरी), राजाराम बिडकर (छत्रपती शिवाजी विद्यालय, नेर्ले तिरवडे), संदीप सावंत (शंकर महादेव विद्यालय, कुंभवडे), भाग्येश कदम (न्यू इंग्लिश स्कुल, फोंडाघाट), प्रसाद पारकर(न्यू इंग्लिश स्कुल, फोंडघाट), संजय पवार (विद्यामंदिर, हरकुल खुर्द), परमेश्वर सावळे (सिंधुदुर्ग सैनिक स्कुल आंबोली) यांचा समावेश आहे. या सर्व तज्ज्ञांचा ई – पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यात या शिक्षकांनी नेहमीच मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांना हा नवा सन्मान येथील शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या सर्व शिक्षकांचे येथील शिक्षणप्रेमींनी कौतुक केले आहे.