सिंधुदुर्गMalvan Tarkarli Beach : मालवणच्या तारकर्ली समुद्रात दुर्दैवी घटना घडली आहे. मालवणच्या तारकर्ली समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या 11 तरुणांपैकी तीन तरुण समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती. मात्र यातील दोन तरुणांना वाचवण्यात नागरिकांना यश आलं आहे. यातील एक जण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हे तरुण कणकवली इथले असल्याची माहिती पुढं आली आहे. सुफियान दिलदार शेख (वय- २४) असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. सुदैवानं दोन तरुणांना वाचावण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर मालवण रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
कणकवलीतील तरुणांचं समुद्र किनाऱ्यावर पर्यटन : मिळालेल्या माहितीनुसार, साकेडी मुस्लीमवाडी कणकवली इथले शावेझ रियाझ शेख व चुलत भाऊ सुफियान दिलदार शेख तसंच झेद अब्दुल्ला शेख, मतीन हारुण शेख, अरबाज इम्तियाझ शेख, शहीद इरफान शेख, साहिल इरफान शेख, उस्मान हनिफ काझी, कतिल नाझीम काझी, युसूफ मुस्ताक काझी आणि मतीन याचा मित्र मेहबूब बाबु नदाफ असे एकूण 11 जणं मालवण समुद्र किनारी फिरण्यासाठी दुचाकीनं तारकर्ली पर्यटन केंद्र इथं आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ते समुद्रात उतरले. यातील सुफियान शेख व अरबाज शेख समुद्रात पोहण्यासाठी उतरल्यावर ते वाहून जात असल्याचं पाहून साहिल शेख आरडा ओरडा करू लागला. साहिलचा आवाज ऐकताच सर्वजण त्या दिशेनं गेले. मतीन शेख, उस्मान काझी त्या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. त्यांनी अरबाज शेखला पाण्यातून बाहेर काढलं. त्यावेळी मतीन हा बुडू लागला असता, पाण्याच्या लाटेत किनाऱ्यावर आला. मात्र, सुफियान हा समुद्राच्या पाण्यात वाहून गेला. बराच वेळ त्याचा शोध सुरु होता. मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. तो अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.