सिंधुदुर्ग - जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असूनही आजपासून नेमके काय सुरू आणि काय बंद, याबाबत जिल्हा प्रशासनाने काहीच स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे व्यापारी वर्गात निर्णयाबाबत संदिग्धता आहे. दारूची दुकाने मात्र उघडण्यात आली नाही. कणकवली बाजारपेठेतील सर्व दुकान सकळी उघडल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु पोलिसांनी तत्काळ दखल घेत ही दुकाने बंद केली.
हेही वाचा...'डायरेक्ट मनी ट्रान्स्फर' फक्त गरीबांपुरत मर्यादित नसावं, ६० टक्के जनतेच्या हातात जास्त पैसा द्यावा'
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य शासनाच्या नियमांच्या अधीन राहून कोणत्या सेवा सुरू राहतील, याबाबत प्रशासनाने कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे माध्यमातून आलेल्या काही बातम्यांच्या आधारे जिल्ह्यातील काही भागातील लहान मोठी दुकाने सुरू करण्यात आली होती. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी लोटली होती. कणकवलीत अत्यंत सामान्यपणे व्यवहाराला सुरवात झाली. पोलीस प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली आणि गर्दी पांगवली. त्यानंतर प्रांताधिकारी राजमाने यांच्या उपस्थितीत कणकवली तहसीलदार पवार यांच्या दालनात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कटेकर यांच्यासह कणकवलीतील व्यापारी उपस्थिती होते. प्रांताधिकारी राजमाने यांनी नियम व अटी सांगत व्यापाऱ्यांना काय सुरू आणि काय बंद ठेवले पाहिजे, याची माहिती दिली.
तळीरामांची निराशा...
ऑरेंज झोन जिल्हा असलेल्या भागात मद्याची दुकाने उघडली जातील, अशी माहिती समोर आली. त्यानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूची दुकाने काही उघडली नाहीत. त्यामुळे तळीरामांची पुरती निराशा झाली आहे. अनेकजण दुकानांच्या आजूबाजूला रेंगाळत होते. मात्र, त्यांना हात हलवत परत जावे लागले.