सिंधुदुर्ग- सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-फणसवाडी येथील युवा उद्योजक योगेश देसाई यांनी कर्ज घेऊन गावातच मशरूम शेती प्रकल्प सुरू केला. मशरूमला गोव्यात मोठी मागणी असल्याने सुरुवातीच्या काळात या व्यवसायात त्यांनी जम बसवला. मात्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यांच्या सीमा बंद झाल्याने कित्येक किलो तयार मशरूम जाग्यावरच कुजून गेली. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाल्याने या प्रकल्पासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे ? असा प्रश्न आता त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मशरूम प्रकल्प हा शेतीचा भाग असल्याने शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
अॅटोमोबाइल इंजिनिअर असलेले योगेश देसाई यांना मुंबई, पुणे येथे नोकरीच्या देखील संधी मिळाल्या होत्या. काही वर्षे त्यांनी मुंबईत नोकरी देखील केली. मात्र नोकरीच्या मागे न पळता आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. या विचारानेच त्यांनी 5 वर्षांपूर्वी मुंबई सोडून गाव गाठले. इतरांहून वेगळा काहीतरी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्थानिक बाजारपेठ, व्यवसायाची प्रगती यावर अभ्यास केला. सिंधुदुर्ग जिल्हा हा कृषिप्रधान असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी मशरूम शेती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. फ्लोरिडा मशरूम नावाने त्यांनी आपला उद्योग सुरू केला.