सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय या दुर्घटनांमध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या गाळेल-सटमटवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यात वेगुर्ले येथील दुचाकी चालक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवारी (23 जुलै) सकाळी घडली आहे. 24 तासानंतर मदतकार्याला सुरवात झाली आहे.
डोंगर कोसळला, तरूण अडकल्याची भीती -
शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गाळेल-सटमटवाडी या मार्गावरून वेंगुर्ले येथील मोटारसायकलस्वार गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी अचानक हा डोंगर कोसळला. त्याखाली तो दबला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
तो तरुण गोव्याला जात होता नोकरीसाठी -
वेंगुर्ले येथील हा तरुण नोकरीनिमित्त गोवा येथे जात होता. पुरामुळे बंद असलेले मार्ग, प्रशासनाने कोविड प्रादुर्भावामुळे घातलेले निर्बंध, मुख्य मार्गावर बसवलेली तपासणी पथके यांना चुकवून हा तरुण कामावर पोहोचण्यासाठी या छुप्या मार्गाने जात होता. यावेळी ही दुर्घटना घडली.