सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या व्यक्तींना शासकीय नुकसान रक्कम देण्यासाठी पैसे मागितल्याच्या कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर झालेल्या आरोपाची दखल जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नियुक्त करीत या समितीला याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता. आपल्या मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देत याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 30 जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती.