सिंधुदुर्ग - लाईट हाऊस आणि लाईट शिप संचालनालयाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक आयलॅण्डवर अडकून पडलेल्या दोन कर्मचाऱ्यांना भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाकडून सुखरूपरित्या आज (बुधवारी) गोव्यात आणण्यात आले आहे. भयावह चक्रीवादळात हे कर्मचारी समुद्रात वेंगुर्ला रॉक आयलॅण्डवर अडकून पडले होते.
भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाकडून मदतकार्य -
डायरेक्टरेट जनरल ऑफ लाईट हाऊस आणि लाईट शिपकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे दोन कर्मचारी वेंगुर्ला येथे रॉक आयलॅण्ड लाईट हाऊसवर गेल्या तीन दिवसांपासून पाणी, जेवण, लाईटविना अडकून पडले होते. त्यांच्या जीवाला धोका असल्याचे भारतीय तटरक्षक दलाला कळवले होते. त्यानुसार भारतीय तटरक्षक दल गोवा विभाग हा मदतीला सरसावला. व त्यांनी गोव्यातील चेतक हेलिकॉप्टरने वास्कोच्या उत्तरेकडे 38 समुद्री मैलांवर असलेल्या वेंगुर्ला दीपगृह येथील दोन कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. या थरारक शोर्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तटरक्षक दलानं ट्विटकरून याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.