सिंधुदुर्ग - कणकवलीत महामार्गाच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीला बाहेरून आधार देण्याच्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे. कणकवलीत नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आंदोलन करत दर्जेदार काम करण्याची मागणी केली होती.
पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि बांधकाम अधिकाऱ्यांनी भिंत कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली होती. तर पालकमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र आज ठेकेदाराने कामाला सुरवात केली आहे.
कणकवलीत उड्डाणपूल बॉक्सेलची संरक्षण भिंत कोसळल्यानंतर आमदार नितेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली शहरातील नागरिकांनी याठिकाणी वाय आकाराच्या पिलरच्या कामाची मागणी केली होती. हे काम होईपर्यंत कणकवली शहरात काम चालू देणार नाही, असा त्यांनी इशारा दिला होता.
या मागणीला दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासला. गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात कणकवलीत काम सुरू करण्यात आले आहे. कणकवली सुपर बाजाराच्यासमोरील संरक्षण भिंत धोकादायक आहे. या भिंतीलाही बाहेरून आधार देण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धोकादायक भिंतीच्या बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत. पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक आणि वाहतूक पोलिसांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. गेले दोन दिवस हे काम होऊ देणार नाही असे म्हणणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांपैकी एकही पुढारी याठिकाणी फिरकला नाही.