सिंधुदुर्ग - मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे. गोवा सेंटर निवडलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी मधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी स्वॅब चाचणीशिवाय गोवा राज्यात प्रवेश मिळावा, किंवा या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये परीक्षेच्या केंद्राची निर्मिती करावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होईल, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरीतून या परीक्षेला ८०० विद्यार्थी बसत आहेत.
मानव संसाधन विकास मंत्रालयाने राज्यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचे आयोजन केले आहे.त्यानुसार भारतभरातील १५५ शहरातील केंद्रांची ही परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सुमारे ३५ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३०० आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ५०० विद्यार्थी परीक्षेला बसत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दुर्गम व डोंगराळ जिल्हे आहेत. याठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या समस्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र म्हणून गोव्याची निवड केली आहे.