सिंधुदुर्ग -जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. करुळ घाटात रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याला कोल्हापूरसह जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे.
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, करुळ घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प - पावसाची बातमी
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. करुळ घाटात रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका भातशेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे घाटातील रस्ते अधिक धोकादायक बनले असून, गुरुवारी सांयकाळी करुळ घाटात रस्ता खचल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. वैभववाडी पोलीस व बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून या ठिकाणी बॅरिकेट्स लावले आहेत.
कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणा-या प्रमुख मार्गांपैकी वैभववाडी तालुक्यातील करुळ हा एक घाट आहे. घाटात धोकादायक दरडी, तुटलेले संरक्षण कठडे, रस्ता खचण्याचे वाढते प्रमाण पाहता हा घाट आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. 35 वर्षांपूर्वी या घाटातून रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. या मार्गावर सतत रहदारी असते. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या घाटाची अवस्था बिकट झाली आहे.