सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण झाली आहे. मालवण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. मसुरे कावावाडी येथे रमाई नदीच्या वाढत्या प्रवाहाने किनारपट्टी गिळंकृत केली आहे.
सिंधुदुर्ग : मसुरेत रमाई नदीच्या वाढत्या प्रवाहाने किनारपट्टी गिळंकृत, घरांना धोका
जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण झाली आहे. मालवण तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले आहे.
दरम्यान, किनाऱ्यालगत असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. एका घरासमोरील तुलसी वृंदावन व तीन मीटर भूभाग नदीत कोसळला आहे. जमिनीला भेगा गेल्या असून घर आणि नदीपात्र यात केवळ एक ते दोन मीटरचे अंतर राहिले आहे. ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. याबाबत ग्रामपंचायत सदस्या सारिका मुणगेकर यांनी ग्रामपंचायत व महसूल प्रशासन तसेच पतन विभागास माहिती दिली आहे.
किनारपट्टीलगत साबाजी हडकर, विजय हडकर व अन्य ग्रामस्थ यांची घरे आहेत. किनारपट्टीची धूप होत असल्याने वर्षभरपूर्वी येथील ग्रामस्थांनी किनारपट्टीला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आता नदीने किनारपट्टी गिळंकृत करण्यास सुरूवात केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मसुरे गाव हा नेहमीच पूर स्थितीत सापडतो. पावसाचा जोर वाढला की मसुरे आणि कावा वाडी परिसरात येणाऱ्या पुरामुळे येथील रहिवाशांना नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरावे लागते. याबाबत शासनाने दखल घेऊन याठिकाणी संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी होत आहे.