सिंधुदुर्ग - गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका करूळ घाटाला बसला असून रस्ता खचल्याने करूळ घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात गेले दोन दिवस सरासरी 262 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात रस्ता खचून गेला. काल या घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र रस्ता अजून खचून जाण्याची शक्यता असल्याने 26 जुलैपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी या घाटाची आज पाहणी केली असून प्रशासनाच्या चुकीमुळे हा घाट कोसळला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सिंधुदुर्गात मुसळधार.. करूळ घाट मार्ग 26 जुलैपर्यंत बंद, नितेश राणेंचा प्रशासनावर निशाणा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा फटका करूळ घाटाला बसला असून रस्ता खचल्याने करूळ घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे करूळ घाटात रस्ता खचून गेला. काल या घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र रस्ता अजून खचून जाण्याची शक्यता असल्याने 26 जुलैपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
घाट मार्ग 26 जुलैपर्यंत राहणार वाहतुकीसाठी बंद -
मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील दरीकडील बाजूने मोरी खचल्यामुळे रस्ता अधिकच खचत असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाट रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हा मार्ग असून या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा महत्वाचा घाट असून हा मार्ग सध्या बंद असल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 26 जुलैपर्यंत अर्थात तेरा दिवसात खचलेल्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम करून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला जाणार आहे. तूर्तास या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटातून वळविण्यात आली आहे.