सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून अनेक नद्यांनी धोका पातळी गाठली आहे. तर या पावसामुळे जिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यातील वाघोटन नदीने इशारा पातळी गाठली आहे. वाघोटन नदीची पातळी 8.250 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाघोटन नदीच्या किनाऱ्यावरील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
14 लघु पाटबंधारे प्रकल्प भरले
जिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प भरले आहेत. कोर्ले सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 370.5250 द. ल. घ. मी पाणीसाठा असून धरण 82.82 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण 175.410 घ. मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तर मध्यम पाटबंधारे प्रकल्प देवघर 61.9720, अरुणा – 39.5112, कोर्ले-सातंडी 25.4740 द. ल. घ. मी. इतका पाणीसाठा झाला आहे.
कणकवलीत दोन्ही नद्यांनी गाठली धोका पातळी
कणकवली तालुक्यातून वाहणाऱ्या गड नदी आणि जाणवली नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे या नदीकिनारच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवली आचरा मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीला बंद झाला आहे. तर कणकवली तालुक्यातील वरवडे गावात या दोन्ही नद्यांच्या संगमावर असलेल्या केटी बंधाऱ्यावर झाडाचे मोठमोठे बुंदे पुराच्या पाण्याने येऊन अडकले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1696.31 मी. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मी. मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मी. मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता दोडामार्ग 150 मी. मी., सावंतवाडी 130 मी. मी., वेंगुर्ला – 131.60 मी. मी., कुडाळ 90 मी. मी., मालवण 157 मी. मी., कणकवली 71 मी. मी., देवगड 65 मी. मी., वैभववाडी 84 मी. मी. असा पाऊस झाला आहे.