पणजी/सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळ रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या समुद्र हद्दीत दाखल झाले. यावेळी गोव्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकारने हे चक्रीवादळ आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत आहे. परिणामी कोकण किनारपट्टी भागासह सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
'तौक्ते’ चक्रीवादळ सिंधुदुर्गाच्या समुद्र हद्दीत दाखल, गोवा-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू - मुसळधार पावसाला सुरुवात
गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. किनारी भागांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. तर गोवा आणि सिंधुदुर्गात विजेचा लपंडाव देखील सुरू आहे. चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी कोळंब काणकोण भागामध्ये रहिवासी क्षेत्रात समुद्राचे पाणी घुसले. तर या भागातील रस्तादेखील समुद्राच्या लाटांनी उद्ध्वस्त झाला आहे.
गोव्यात जोरदार पाऊस आणि वादळी वारे
'तौक्ते’ चक्रीवादळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पणजी पासून समुद्रात एकशे तीस किलोमीटर अंतरावर दाखल झाले. यावेळी या वादळाचा वेग तासाला 13 किलोमीटर असा होता. अशी माहिती हवामान विभागाने सकाळी जाहीर केलेल्या बुलेटिन मधून दिली आहे. हे वादळ आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र हद्दीमध्ये सरकले आहे. यामुळे गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. किनारी भागांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. तर गोवा आणि सिंधुदुर्गात विजेचा लपंडाव देखील सुरू आहे. चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आले आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी कोळंब काणकोण भागामध्ये रहिवासी क्षेत्रात समुद्राचे पाणी घुसले. तर या भागातील रस्तादेखील समुद्राच्या लाटांनी उद्ध्वस्त झाला आहे. गोव्यात एनडीआरएफच्या पथकासह अन्य सुरक्षा एजन्सीची पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान अद्यापही गोव्यात मोठ्या नुकसानीची घटना घडल्याची माहिती समोर आलेली नाही.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत जातीनिशी कंट्रोल रूममध्ये उपस्थित-
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हे वादळ घोंगावत असले तरी, समुद्राला सुकती असल्यामुळे लाटांचा फारसा प्रभाव किनारी भागामध्ये जाणवत नाही. दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे किनारी भागात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रात्री 1.30 वाजता वेंगुर्ला येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रात्री 2.30 वाजता मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते. यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा कंट्रोल रूम ओरोस येथे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर सकाळी 5 वाजल्यापासून पालकमंत्री उदय सामंत जातीनिशी कंट्रोल रूम मध्ये उपस्थित होते. सकाळी हे वादळ जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत दाखल झाल्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी कंट्रोल रूम मधून किनारपट्टी भागातील परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजूनही धोका टळलेला नाही
रविवारी दुपारी बारा नंतर हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतून रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने जाईल. यावेळी समुद्राला भरती येणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला देवगड व आचरा या भागात वादळाचा फटका बसू शकतो. अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात वादळामुळे पावसाचा जोर कायम आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड या किनारी तालुक्यांसह सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या भागातही जोरदार पाऊस लागत आहे. मालवणच्या काही भागात झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. मात्र लोकवस्तीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.