सिंधुदुर्ग - ग्रामीण भागात कोरोना विषाणू विरोधात लढा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात ३८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप केंद्रातील डॉक्टर, नर्स यांसह सर्व कर्मचारी यांना कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सज्ज केले आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक यांनी सांगितले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...गाव दिसू दे गा देवा..! मुंबईसह उपनगरातील लाखो मजुरांचा गावाच्या दिशेने पायी प्रवास
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप केद्रांवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार मास्क, अर्धा लिटरच्या ७१८ सॅनिटायझरच्या बॉटल्स , ४२५ पीपीई कीट आणि आमदार विकास निधीतून २ कीट, याप्रमाणे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ७ पीपीई कीटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रत्येकी ५० पीपीई किटचा पुरवठा काही दिवसात केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभाग आणि यंत्रणा कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सक्षम आहे, असे समिधा नाईक यांनी सांगितलेय
वेंगुर्ला येथे एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी खलीफे यांनी सदर भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे. आता शहरा बरोबर ग्रामीण भागातही आरोग्य विभाग कोरोनाला हरवायला सक्षम बनत आहे, असेही नाईक यांनी सांगितले.