सिंधुदुर्ग - लॉकडाऊनचे पालन केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुट देण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये शुक्रवारी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे लॉकडाऊनमध्ये कोणतीही सुट नाही - पालकमंत्री उदय सामंत
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये शुक्रवारी पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासन आणि पोलीस यांच्यामध्ये चांगला समन्वय असून ते व्यापाऱ्यांना चांगले सहकार्य करत असल्याचे उदय सामंत म्हणाले. ३ मे नंतर टाळेबंदीबाबत नवीन नियम येणार आहेत. यंत्रणेवरही कोरोना टाळेबंदीची अंमलबजावणी करताना दबाव आहे. सध्या जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू आहे. व्यापाऱ्यांनी या काळात प्रशासन व पोलीस यांना सहकार्य करावे. लघु उद्योगातील कामगारांना पास देण्याविषयी विचार करू. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या एकाच वेळी येणार नाहीत याची दक्षता व्यापाऱ्यांनी घ्यावी. लाकूड वाहतूकीस व फळांच्या वाहतूकीस जिल्ह्यामध्ये परवानगी असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षाला परवानगी
ग्रामीण भागामध्ये अनेकवेळा रिक्षावाले ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात नेणे व त्यांचे वाण सामान आणण्याचे काम करतात. त्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, की रिक्षावाल्यांनी ज्येष्ठ नागरिकांची आणि रुग्णांची वाहतूक करावी, मात्र, डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रे सोबत ठेवावीत. जेणेकरुन रुग्ण वाहतूक करणाऱ्या रिक्षांना त्रास होणार नाही, याची पोलिसांनी काळजी घ्यावी.
तसेच गाव पातळीवर ग्रामपंचायतीने एक रिक्षा रोज अधिग्रहित करुन ठेवावी. त्याचा वापर ग्रामीण भागातील लोकांना सिलेंडर, रेशन यांची वाहतूक करण्यासाठी होईल. ही रिक्षा रोटेशन पद्धतीने रोज एक अधिग्रहित करावी. यामुळे रिक्षेवाल्यांना थोडाफार रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.