सिंधुदुर्ग - खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने पोलिसाला केलेल्या दमदाटीप्रकरणी जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. आज कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांची भेट घेत खासदारपुत्र गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली आहे. भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्यावर पालकमंत्री तसेच खासदार विनायक राऊत यांच्याकडून दबाव आणण्याचा सुरू असलेला प्रकार थांबवा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गात राजकारण तापले; विनायक राऊत यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची भाजपाची मागणी
भाजपाच्या वतीने आज पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. वाहतूक पोलीस विश्वजित परब यांच्यावर पालकमंत्री तसेच खासदार विनायक राऊत यांच्याकडून दबाव आणण्याचा सुरू असलेला प्रकार थांबवा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात अली आहे.
गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर, जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही भाजपाने दिला आहे. यावेळी कणकवली भाजपा अध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, युवक जिल्हा सचिव संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. याप्रकरणी कोणतीही तक्रार देऊ नये, असा दबाव वाहतूक पोलीस कर्मचारी विश्वजित परब यांच्यावर आणला जात आहे, असा आरोप यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कांदे यांनी केला. परब हे एक कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत. मात्र, त्यांची मानसिक स्थिती आता चांगली नाही. असे कारण पुढे करून त्यांना तक्रार देण्यापासून रोखले जात आहे, असा आरोपही भाजपाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे यांनी केला आहे.