सिंधुदुर्ग- ज्या कोकणी माणसाच्या जीवावर सेना उभी राहिली त्या कोकणी माणसाच्या मुंबईकर चाकरमान्यांना मोफत प्रवास सुविधा देणे आवश्यक होते. मात्र, त्यांना आर्थिक भुर्दड सोसूनही ही सुविधा उपलब्ध होत नाही. अनेक दिव्यातून गावी पोहचलेल्या चाकरमान्यांची तपासणी व योग्य सुविधेसह विलगीकरणही होत नाही. चाकरमान्यांच्या या अवस्थेला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच या चाकरमान्यांना मुंबई भाजपकडून खासगी बस सेवा पुरवली जाईल, असेही ते म्हणाले, .
'चाकरमान्यांच्या अवस्थेला सरकारच जबाबदार, भाजप देणार बस सुविधा' - sindhudurg corona news
चाकरमान्यांच्या या अवस्थेला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच या चाकरमान्यांना मुंबई भाजपकडून खासगी बस सेवा पुरवली जाईल, असेही ते म्हणाले,
भाजप आमदार व नेत्यांसह दरेकर कोरोना आढाव्यासाठी जिल्हय़ात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी चाकरमान्यांच्या प्रश्नाला हात घातला. त्यांच्यासोबत माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार महेश बाल्दी, प्रशांत ठाकूर, भाई गिरकर, निरंजन डावखरे, प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाकरमान्यांनी एवढय़ात गावाकडे जाऊ नये. तेथे तपासणी व अलगीकरणाच्या सुविधा नाहीत, असे दोनच दिवसांपुर्वी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे शासनाचे अपयश आहे. अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईकर व गावकरी यांच्यात वाद लावून देण्याचे काम सुरू आहे. त्याऐवजी चाकरमान्यांना योग्य सुविधा देऊन गावाकडे आणणे आवश्यक असल्याचे दरेकर यांनी सांगितले. सिंधुदुर्गात स्वॅब तपासणी केंद्र नाही. पडवे येथील नारायण राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा येत्या 8 दिवसात सुरू होईल, असे दरेकर यावेळी म्हणाले.