सिंधुदुर्ग- जिल्ह्यात नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांना सुपूर्त केली आहे.
अखेर सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता! - Guardian Minister Uday Samant
जिल्ह्यात नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
![अखेर सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता! Approval of State Cabinet for establishment of Medical College](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9192286-531-9192286-1602818567127.jpg)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत शिवसैनिकांनी फटाके वाजवत व पेढे वाटत जल्लोष केला.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांनुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालयाकरीता किमान ३०० रुग्णखाटांचे रुग्णालय सोईसुविधांसह उपलब्ध असणे आवश्यक आहे. 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत वर्षा निवासस्थानी झालेल्या कोकणातील आमदारांच्या बैठकीत दीपक केसरकर व वैभव नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आग्रही मागणी केली होती. तसेच वैभव नाईक यांनी वारंवार आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. तसेच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनीही यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.