सिंधुदुर्ग - जिल्ह्यात रायगड, कोल्हापूर येथून ऑक्सिजन पुरवठा होणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सिंधुदुर्गसाठी वेर्णे-गोवा येथील ऑक्सिजन प्लान्टमधील ऑक्सिजन साठा देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करताना त्या-त्या तालुक्यातील केंद्रानुसारच लस देण्याच्या दृष्टीने राज्यातील आमदारांच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'ऑक्सिजन-व्हेंटिलेटरचा प्रश्न उद्भवणार नाही'
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गसाठी काही ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आता ऑक्सिजन व्हेंटिलेटरचा प्रश्न उद्भवणार नाही. वेंगुर्ल्यातील 50 बेडचे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच आरवली ट्रस्टमार्फतही कोविड सेंटर सुरू करण्याचा विचार आहे. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. तसेच येथे संशयित कोरोना रुग्णांसाठी काही व्यवस्था करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. समर्पित कोविड सेंटरमध्ये भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात आणखी दहा बेड तयार करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.