सिंधुदुर्ग - गोवा सरकारकडे विमान नाही, हे संजय राऊत यांना माहीत आहे. मात्र, गोव्याकडे विमान असते तर ते राज्यपालांचेच असले असते, महाराष्ट्रात घडलेल्या प्रकारावर न बोललेलं बरं, अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर उत्तर दिले आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
'तर गोव्याचे विमान राज्यपालांचेच असले असते, महाराष्ट्रातल्या प्रकारावर न बोललेलं बर' - गोवा सरकारकडे विमान नाही
राज्यपालांना सरकारी विमान वापरास परवानगी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर ते गोव्याचेही राज्यपाल असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला होता, आता त्यावर डॉ. सावंत यांनी उत्तर दिले आहे.
काय घडलं होत राज्यपालांच्या बाबतीत
राज्यपाल कोश्यारी यांना उत्तराखंडसाठी सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी राज्यसरकारच्या सामान्य विभाग प्रशासनाकडून नाकारण्यात आली. यामुळे भगतसिंह यांना ऐनवेळी विमानातून उतरावं लागलं आणि खासगी विमानाची व्यवस्था झाल्यानंतर उत्तराखंडसाठी रवाना व्हावे लागले. या प्रकारावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्याच प्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणावरून संजय राऊतांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना महाराष्ट्रात जे घडलं त्याबाबत न बोललेलच बरे,असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत-
राज्यपालांच्या विमान प्रवास प्रकरणावर संजय राऊत यांना विचारणा केली असता, राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारलेले नाही. व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियमच आहे. उद्धव ठाकरे यांच्याजागी दुसरे कोणतेही मुख्यमंत्री असते तर त्यांनीही असंच केलं असते. तसेच भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधूनमधून गोवा सरकारचेही विमान वापरावे, थोडा भार त्यांच्यावरही टाकावा, असंही संजय राऊत म्हणाले होते.